जळगाव : जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रविण साळुंखे यांच्या संकल्पनेतून आणि जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने सन 2002 मधे ट्राफिक वार्डन सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक आणि वाहनसंख्या लक्षात घेत या सेवेची सुरुवात करण्यात आली होती. वार्डनची भलीमोठी फौज त्यावेळी वाहतुक शाखेच्या दिमतीला देण्यात आली होती.
10 सप्टेबर 2002 रोजी या ट्राफीक वार्डन सेवेचा भव्यदिव्य शुभारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रविण साळुंखे यांच्यासह वाहतुक शाखेचे पोलिस उप निरीक्षक उत्तम सोनवणे, उद्योगपती मनिष जैन, रजनीकांत कोठारी, बाबूशेठ श्रीश्रीमाळ व सुरेशदादा जैन आदींच्या याप्रसंगी उपस्थिती होती.
वाहतुक सुरळीत करण्यासह गुन्हे उघडकीस आणण्याकामी देखील या वार्डन सेवेचा जळगाव पोलिस दलास फायदा झाला. वार्डन शाखेचे प्रमुख असलेले रफीक शेख यांचा गुन्हे उघडकीस आणण्याकामी मोलाचा वाटा ठरला. मोटार सायकल चोरट्यास पकडून देणे, एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षांचा उलगडा करणे यासह मोटार सायकलस्वारास धडक मारुन पळून जाणा-या टॅंकर चालकास पकडून देण्याकामी रफीक शेख या वार्डन प्रमुखाची कामगिरी त्यावेळी उल्लेखनीय ठरली. मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याची कामगिरी लक्षात घेत रफीक शेख यांचा तत्कालीन पोलिस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान देखील करण्यात आला होता.
याशिवाय विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदींच्या व्हीआयपी बंदोबस्तासह गणपती उत्सव, सिंधी कॉलनीत दरवर्षी होणारा मेळावा आदींमधील वाहतुक नियंत्रणकामी वार्डन टीमने आपला सहभाग नोंदवला आहे. जळगाव महानगरपालिकेकडून देण्यात येणा-या मानधनावर या वार्डन टीमचा चरितार्थ सुरु होता. मात्र कोरोना काळात या सेवेला महानगरपालिकेकडून ब्रेक लागला.
सुरुवातीला महानगरपालिकेकडून वार्डन पथकाला दिले जाणारे मानधन रोखण्यात आले. गेल्या अडीच वर्षापासून हे वार्डन आज जळगाव शहराच्या चौकात दिसत नाही. हे वार्डन सध्या मिळेल ते काम करुन आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. कुणी मजुरी तर कुणी चौकीदारी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. ही वार्डन सेवा पुन्हा सुरु होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार देखील झाला. मात्र लालफितीत अडकलेला हा पत्रव्यवहार हवी तशी गती घेत नसल्याचे दिसून येत आहे.