घरफोड्यांची वक्र नजर आता शिक्षकांच्या घरावर

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चो-या व घरफोड्यांचे सत्र सुरुच असून नागरिकांनी देखील सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. दिवाळीनिमीत्त परगावी जाणा-या नागरिकांच्या बंद घरांना हेरुन चोरटे त्यांची दिवाळी साजरी करत आहेत. दररोज जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशनला चो-या व घरफोड्यांचे गुन्हे दाखल होत आहेत. याशिवाय मोटार सायकल चोरीच्या घटना देखील डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. मेहुणबारे व बोदवड पोलिस स्टेशनला शिक्षकांच्या घरी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे.

मेहुणबारे पोलिस स्टेशनला 29 ऑक्टोबर रोजी शिक्षकाच्या घरी 8 लाख 20 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्देमालात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. मुकेश धनराज पाटील या शिक्षकाच्या चाळीसगाव तालुक्यातील खेडीखुर्द या गावातील घरात हा घरफोडीचा प्रकार झाला आहे. मुकेश पाटील हे पुणे येथे वास्तव्याला आहेत. दुस-या घटनेत जामठी ता. बोदवड येथील शिक्षक कुणाल भगवान महाजन यांच्या दुकानातून 73 हजार 600 रुपयांचा किराणा दुकानातील सामान व कृषी दुकानातील रोख रकमेचा समावेश आहे.

चाळीसगाव ग्रामीण हद्दीतील वाघळी येथील चिकन विक्रेत्याच्या दुकानातून एकुण 49 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. सागवान लाकडाचे चार दरवाजे, चार चौकटा, दोन इलेक्ट्रीक वजन काटे, लाकडी सोफा व चिकन कापण्याचे चार सुरे अशा मुद्देमालाचा त्यात समावेश आहे.
मुक्ताईनगरच्या रिंगाव शिवारातून इलेक्ट्रीक ट्रांसफॉर्मरमधील 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या ताब्याच्या कॉईलसह 4500 लिटर ऑईलची चोरी झाली आहे. एकुण 8 लाख 65 हजाराचा मुद्देमाल या घटनेत चोरी झाला आहे. याशिवाय दररोज मोटार सायकल चोरीच्या घटना घडत आहेत. ग्राम सुरक्षा पथकाच्या माध्यमातून रात्री होणा-या चो-यांवर अमळनेर तालुक्यात चांगल्या प्रकारे आळा बसल्याचे दिसून आले आहे. या पथकाच्या माध्यमातून काही गुन्हे उघडकीस देखील आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here