बनावट बिले, बनावट चेक प्रकरणी एकास अटक

जळगाव : लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करुन सह्या करणा-या ऑफीसबॉयसह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार संशयीतास अटक करण्यात आली आहे. अविनाश कोमल पाटील रा. पिंप्राळा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एकुण नऊ पैकी चौघांना यापुर्वी अटक करण्यात आली आहे. इतर चौघांचा शोध सुरु आहे.

एमआयडीसी परिसरात सुबोध चौधरी आणि त्यांचा भाऊ सुनिल चौधरी यांची अनुक्रमे समृद्धी केमिकल्स आणि सुबोनियो केमिकल्स या नावाची कंपनी आहे. समृद्धी केमिकल्समधे विशाल पोपट डोके हा ऑफीसबॉय म्हणून कामाला होता. विशाल डोके याने दोन्ही कंपन्यांच्या चेकवर बनावट सह्या करुन एकुण 46 लाख 87 हजार 752 रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. बनावट सह्यांचे चेक बॅंकेतून वटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला अविनाश कोमल पाटील हा पिंप्राळा येथे आला असल्याची माहिती पो.नि. शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, संदीप धनगर आदींनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली.

अटकेतील अविनाश पाटील यास न्या. जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 5 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. मेघा खैरनार रा. मारोती पेठ जळगाव, संजय छेडा रा. गणेश कॉलनी जळगाव, पुनमचंद पवार रा. सिंधी कॉलनी जळगाव आणि विजय सैंदाणे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here