जळगाव : घरात जवळपास एक ते दिड कोटी सहज मिळतील आणि आपली सर्व तंगी दूर होईल या आशेने दरोडा टाकणा-या सातही तरुणांच्या हाती काही लागले नाही मात्र त्यांच्या नशीबी जेलवारी आली. शस्त्राचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न करणा-या टोळीला अवघ्या तिन दिवसात जेरबंद करणा-या स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या पथकाचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी कौतुक केले आहे.
जळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक तथा दुचाकी आणि चारचाकी शो रुमचे मालक किरण बच्छाव यांच्या निवासस्थानी 14 नोव्हेंबर 2022 च्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून आलेल्या सात जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झालेली आरडाओरड आणि जमलेला जमाव बघून दरोडा टाकण्यासाठी आलेली तरुणांची टोळी पसार झाली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (32), करण गणेश सोनवणे (19), यश उर्फ गुलाब सुभाष कोळी (21), दर्शन भगवान सोनवणे (29), अर्जुन ईश्वर कोळी (पाटील) (31), सचिन रतन सोनवणे (25), सागर दिलीप कोळी (28) सर्व रा. विदगाव जिल्हा जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत तरुणांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध यापुर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. केवळ आपले कर्ज फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी दरोड्याचे नियोजन केले होते.
जळगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक किरण बच्छाव यांच्या सर्व प्रतिष्ठानांमधे दररोज सायंकाळपर्यंत लाखो रुपयांची रोकड जमा होत असते हे सर्व सातही संशयीत आरोपींनी माहिती करुन घेतले होते. बच्छाव यांच्या मालकीचे वाहनांचे सर्व शो रुम सायंकाळी व रात्री उशिरा बंद होत असल्यामुळे वाहन विक्रीची जमा होणारी रोकड ते घरी ठेवत असल्याच्या माहितीवरुन सर्व सात तरुणांनी त्यांच्या निवासस्थानी दरोड्याचे नियोजन केले. अटकेतील किरण उर्फ बंडा भानुदास कोळी हा सर्वांचा म्होरक्या होता. त्यानेच हे कट कारस्थान ठरवले होते. सात ते आठ महिन्यांपासून त्याने किरण बच्छाव यांच्या जळगाव स्थित रिंग रोड परिसरातील निवासस्थानाची रेकी करुन घेतली होती. उद्योजक किरण बच्छाव दररोज रात्री रोकड घरी आणतात ही पक्की खबर त्याने मिळवली होती. त्यांच्या निवासस्थानी किमान एक ते दिड करोड रुपये मिळतील असा सर्वांचा समज होता.
मुख्य संशयीत आरोपी अनिल उर्फ बंडा कोळी याच्यासह त्याचे साथीदार आर्थिक स्वरुपात पिचलेले होते. कुणी घरगुती खर्चाने, कुणी व्यवसायात अपयश आल्यामुळे, कुणी सट्टापत्ता खेळण्याच्या नादात तर कुणी दारु पिण्याच्या नादात कर्जबाजारी झाला होता. सर्वजण आपली आर्थिक तंगी आणि मंदी दुर सारण्याच्या प्रयत्नात होते. या दरोड्यातून सर्वांच्या वाट्यावर लाखो रुपये येतील असे त्यांचे मत होते.
ठरल्यानुसार 14 नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास सर्व जण किरण बच्छाव यांच्या निवासस्थानी गेले. एकाने लहान बालकाच्या गळ्याला चाकू लावला. एकाने बच्छाव यांचा मोबाईल हिसकावून घेतला. एकाने किरण बच्छाव यांना घट्ट पकडून ठेवले. मात्र घरातील सर्वांनी जोरजोरात आरडाओरड सुरु केली. रात्रीची फार वेळ झाली नसल्यामुळे परिसरातील नागरिक आरडाओरड ऐकून धावतच आले. आलेला जमाव आणि सातत्याने सुरु असलेला आरडाओरड आणि गदारोळ बघून जमाव मोठ्या प्रमाणात जमला. जमाव बघून बच्छाव यांचा मोबाईल हिसकावत सर्व जण रिकाम्या हाताने पळून गेले. दरम्यान पळून जात असतांना हिसकावलेला किरण बच्छाव यांचा मोबाईल परिसरात फेकून सर्व जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तो मोबाईल पोलिस पथकच्या हाती घटनास्थळी भेट दिल्यानंतर मिळाला होता.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांच्या पथकाने पुढील तपासाला वेग दिला. या तपासकामी चार पथकांची निर्मीती करण्यात आली. तांत्रीक विश्लेषण पथकात पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदीप सावळे, पोलिस नाईक किरण चौधरी व लोकेश माळी यांचा समावेश करण्यात आला.
इतर चार पथकात व गणेश चौबे यांच्यासह एलसीबी कर्मचा-यांचे एकुण चार पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, सहायक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ. राजेश मेढे, संजय हिवरकर, लक्ष्मण पाटील, पोकॉ प्रमोद ठाकुर, पोना प्रविण मांडोळे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, रविद्र पाटील, हे.कॉ. अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, दर्शन ढाकणे आदींचा समावेश करण्यात आला.
या पथकाने गोपनीय माहितीसह तांत्रीक माहितीच्या आधारे सर्व सात संशयीत आरोपी निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. अटकेतील सर्व सातही संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिस पथक करत आहेत. अटकेतील सर्वांनी प्रथमच गुन्हा केला व त्यात ते पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध यापुर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही.