पुणे (सुपे) : बारामती तालुक्याच्या काळखैरेवाडी अंतर्गत राजबाग येथे सख्या भावानेच भावाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. घरातुन वेगळे राहण्याच्या वाद दोघा भावात सुरु होता. या वादातून मारुती वसंत भोंडवे हा ७० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान ससुन रुग्णालयात त्याचा आज दुपारी मृत्यू झाला.
पोलिसांनी फरार झालेल्या अनिल वसंत भोंडवे (३२) रा. राजबाग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काळखैरेवाडी अंतर्गत राजबाग येथे बुधवारी रात्री राहत्या घरी मारुती, त्याची पत्नी सविता आणि मुलगा महेश व हर्षद असे सर्वजण झोपले होते. त्यावेळी धाकटा भाऊ अनिल याने घराची कडी बाहेरुन लावुन घेतली. खिडकीच्या काचा फोडुन मोठा भाऊ मारुतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यानंतर अनिल फरार झाला.
मारुतीची पत्नी त्याला विझवण्यासाठी सरसावली. मात्र ती देखील त्या आगीत भाजली गेली. तिने आरडाओरड केल्यामुळे शेजारी जमा झाले व त्यांनी मदत केली. वैद्यकीय उपचारासाठी मारुती ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७० टक्के भाजलेल्या मारुतीचा आज दुपारी मृत्यु झाला. मृत्यूपुर्वी त्याचा जवाब घेण्यात आला. पुढील तपास स.पो.नि. सोमनाथ लांडे करत आहेत.