नागपूर : आरएसएसचे नागपूर शहरातील रेशीमबाग स्मृतीमंदीर परिसरात असलेले कार्यालय आणि कवीवर्य भट सभागृह बॉंम्बने उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी देणा-या विज पारेषण मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. सचिन कुलकर्णी असे त्या अभियंत्याचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे अभियंता सचिन कुलकर्णी पोलिसांच्या तावडीत सापडला.
25 नोव्हेंबर रोजी नागपूर शहरातील सक्करदरा पोलिस स्टेशनला एक निनावी पत्र मिळाले. त्या पत्रात संघाचे कार्यालय आणि कविवर्य सुरेश भट सभागृह बॉंम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय बॉंम्बचे एक पत्र देखील त्या पत्रात काढण्यात आले होते. हिंमत असल्यास पोलिस आयुक्तांनी हा बॉंम्बस्फोट हाणून पाडावा असे थेट आव्हान देण्यात आले होते.
पोलिसांच्या तपास पथकाने जवळपास दोनशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. नागपूर शहरातील झिरो माईल येथील पोस्ट ऑफीसमधे निनावी पत्र पोस्टाच्या पेटीत टाकणा-या एका व्यक्तीला चौकशीकामी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांच्या ताब्यातील सचिन कुलकर्णी हा महापारेषणच्या अंबाझरी लोड डिस्पॅच कार्यालयात नेमणूकीला असून त्याने हा प्रकार का केला याची चौकशी केली जात आहे.