जळगाव : पतंजली योगपीठ ट्रस्टच्या नावे योगासन आणि प्राणायम प्रशिक्षणाच्या खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून 1 लाख 19 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतंजली योगपीठ ट्रस्ट युनीट 2 हरिद्वार उत्तराखंड या संस्थेला सात दिवसांच्या योगासन आणि प्राणायम प्रशिक्षणाबाबतची एक जाहीरात धरणगावचे किशोर मंगेश पाटील यांनी वाचली. या जाहीरातीच्या माध्यमातून बॅंकेचा खाते क्रमांक देण्यात आला होता. या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. जाहीरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किशोर पाटील यांनी संपर्क साधत माहिती घेतली होती.
पलीकडून बोलणा-या अज्ञात मोबाईल धारकाने या जाहीरातीत दिलेल्या खाते क्रमांकाऐवजी दुस-याच्या बॅंक खाते क्रमांकावर फोन पे च्या माध्यमातून वेळोवेळी एकुण 1 लाख 19 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. किशोर पाटील यांनी ती रक्कम जमा केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर किशोर पाटील यांनी ती रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र किशोर पाटील यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक अमोल गुंजाळ पुढील तपास करत आहेत.