नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित केले. देशाला संबोधीत करतांना पंतप्रधान मोदी यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्यावर भाष्य केले. मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत समितीच्या अहवालाची प्रतिक्षा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत शासन विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील 40 कोटी जनधन खात्यांपैकी 22 कोटी खाती महिलांची आहेत. कोरोना विषाणूच्या कालावधीत महिलांच्या खात्यांवर एप्रिल, मे, जून या महिन्यात जवळपास 30 हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आज महिला कोळसा खाणींसह लढाऊ विमानांद्वारे आपले प्राविण्य दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय महिलांना मिळालेल्या संधीचे प्रत्येकवेळी सोने केले आहे.
नोकरदार गर्भवती महिलांसाठी भरपगारी 6 महिन्यांची सुटी देण्यात आल्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तिहेरी तलाकमुळे त्रस्त महिलांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गरीब मुलींच्या आरोग्याची चिंता शासनाला असल्याचे त्यांनी सांगितले.नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
या कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णावर काय काय उपचार केले? कोणती औषधे केव्हा दिली? त्याला असलेले आजार व त्यावर झालेले निदान याची माहिती या कार्डच्या माध्यमातून ठेवली जाणार असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणातुन सांगितले. या हेल्थ कार्डचा उपयोग मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर राहणार आहे.