जळगाव : पाच हजाराची मागणी पुर्ण न झाल्याने थेट छातीवर पिस्तुल रोखून जीवे ठार करण्याचा प्रयत्न याशिवाय धमकी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे ता. जामनेर) असा गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
अनिल राजाराम चौधरी या तरुणाचा नर्सरी आणि शेतीचा व्यवसाय आहे. 13 डिसेंबरच्या सायंकाळी ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी अनिल चौधरी यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर अनिल चौधरी यांनी आपल्याजवळ आज पैसे नसून काम असल्यास उद्या देतो असे म्हटले. अनिल चौधरी यांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ज्ञानेश्वर गोसावी याने अनिल चौधरी यांच्या छातीवर पिस्तुल रोखून तुला आज रात्री आठ वाजेपर्यंत जीवंत ठेवणार ठेवणार नाही अशी धमकी दिली. तु मेल्यावर तुझ्या निवडणूक पॅनलचे काय होईल ते मी पाहून घेईन अशी देखील धमकी दिली.
यातील तुषार संजय गोसावी याने अनिल चौधरी याची कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याला आता जीवंत सोडायचे नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक मोहीते करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.