जळगाव दि. १५ (प्रतिनिधी) : आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश चित्रातुन देता येतो. ‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे सकारात्मक संदेश देणारे आहे. कुठल्याही गावाची ओळख ही तेथील कलावंतांमुळे होते यासाठी जळगाव मधील कलावंत प्रयत्न करत असल्यानेच आम्हाला सर्वांना कलेविषयी जिव्हाळा आहे, अभिरुची आहे आणि कलावंताविषयी नितांत आदरभावना असल्याचे सांगितले.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रद्धेय मोठ्याभाऊंना समर्पित असलेल्या ‘चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खान्देशातील चित्रकार प्राचार्य राजू महाजन, राजू बाविस्कर विकास मल्हारा, विजय जैन यांच्या कलाकृतींचा सहभाग असलेले हे प्रदर्शन पु.ना.गाडगिळ आर्ट गॕलरीमध्ये दि. 30 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाहता येईल.
याप्रसंगी प्राचार्य एस. एस. राणे, कवि अशोक कोतवाल, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, अनिल जोशी, दिपक चांदोरकर, एन. ओ. चौधरी, चित्रकार जितेंद्र सुरळकर, सचिन मुसळे, शाम कुमावत, योगेश सुतार, विनोद पाटील, हर्षल पाटील यांच्यासह मान्यवर व कलारसिक उपस्थित होते. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी प्रास्तविक शंभू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
पुढे बोलताना अशोक जैन म्हणाले की, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचे महत्त्व आपण जाणतोच, कलेचेही माणसाच्या रोजच्या जगण्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपला कान्हदेश कला-साहित्य- संस्कृती संदर्भात अग्रेसर आहे. उदाहरणच द्यायचे तर अजिंठ्याच्या लेण्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. जैन इरिगेशन कंपनीच्या सहा दशकांच्या वाटचालीत शास्त्रज्ञांना- संशोधकांना-अभ्यासकांना मान-सन्मान संस्थेने दिलाच कलावंतांचाही आदर सत्कार केला. जैन हिल्सवरिल, जैन व्हॅलीतील, डिव्हाईन पार्क परिसरातील अनुभूती स्कूलच्या प्रांगणातील एकूणएक सारी रचना, तेथील वस्तू-वास्तू-शिल्प या सर्व बाबतीत एक खास अनुभव पाहणाऱ्यांना येतो. गांधीतीर्थच्या सुरवातीलाच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार सदाशिवजी साठे यांनी हा अतिशय सुंदर असा पुतळा साकार केला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या म्युझिअमच्या इमारतीलाही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कारांनी विभूषित करण्यात आले आहे. आजच्या या चित्र प्रदर्शनीतील राजू बाविस्करचे काही चित्र गांधीतीर्थमध्ये सुशोभित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एस. एस. राणे यांनी मनोगत व्यक्त करताना कला ही जोपासता आली त्यासाठी आंतरिक प्रेरणा लागते त्यातून चित्रकाराला विचारांच्याही पलिकडेचे दिसते आणि तेच भाव त्याच्या चित्रात उमटत असतात.