पणजी : सध्या सर्वत्र कोरोना विषाणून धुमाकुळ घातला असतांना गोव्यात मात्र रेव पार्ट्या सुरु असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या स्वातंत्र दिनाच्या रात्री गोवा गुन्हे शाखेने एका रेव पार्टीवर छापा घातला. वागातोर येथील फिरंगी विलास नावाच्या एका बंगल्यात घालण्यात आलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या पार्टीत सहभागी झालेल्या विदेशींसह एकुण 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवा पोलिसांनी या बंगल्यावर नजर ठेवली होती. स्वातंत्र दिनाच्या मध्यरात्री छापा पडताच काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र 23 जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. अटकेतील बहुतांश जण हे गोव्याच्या बाहेरचे आहेत. यात तिन विदेशी महिला आहेत. या छाप्यात 9 लाख रुपयांचे ड्र्ग्ज जप्त करण्यात आले.
एक्स्टेसी हा अतिशय घातक अंमली पदार्थ तसेच एमडीएमएच्या गोळ्या आणि चरस असे पदार्थ यात मिळून आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर, महिला उपनिरीक्षक रिमा नाईक आणि संध्या गुप्ता यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.