जळगाव : सुरुवातीला तिन हजार रुपयांच्या लाच मागणीनंतर तडजोडीअंती अडीच हजार रुपयांची लाच स्विकरतांना ग्रामसेवकास एसीबीच्या सापळ्यात अडकण्याची वेळ आज आली. अनिल नारायण गायकवाड (रा. चहार्डी ता. चोपडा) असे गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ता.धरणगाव येथील ग्रामसेवकाचे नाव आहे. तिन दिवसांपुर्वी निम ता. अमळनेर येथील ग्रामसेवक 25 हजार रुपयांची लाच घेतांना पकडला गेल्यानंतर लागलीच ही दुसरी घटना घडली आहे.
या घटनेतील तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी आहेत. तक्रारदार यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक यांचेकडे सन 2015 ते 2020 या कालावधी दरम्यान या दोन्ही ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाच्या लेखापरीक्षण बाबतची माहिती माहितीच्या अधिकारात लेखी स्वरुपात मागणी केली होती.
संबंधीत माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक अनिल गायकवाड यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला तिन हजार रुपयांची व नंतर तडजोडीअंती अडीच हजार रुपयांची मागणी केली. धरणगाव – अमळनेर रस्त्यावरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष लाच स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शंनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे, पो.ना.ईश्वर धनगर पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ. सचिन चाटे, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.