जळगाव : लाकडी दांड्याने जबर दुखापत करणा-या फरार हद्दपार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सोनुसिंग रमेश राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
22 नोव्हेंबर 2022 रोजी एमआयडीसी हद्दीतील सुप्रीम कॉलनी परिसरात गोपाळ राजाराम सपकाळे हे प्रात:र्विधी करुन परत येत असतांना सोनुसिंग राठोड याने त्यांना पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर तुला जीवंत सोडणार नाही अशी गोपाळ सपकाळे यांना सोनुसिंग राठोड याने धमकी देखील दिली होती. पैसे देण्यास नकार मिळाल्याने सोनुसिंग याने गोपाळ सपकाळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत सपकाळे यांच्या दोन्ही हाताच्या दंडाला फ्रॅक्चर झाले होते.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी सोनुसिंग राठोड हा फरार होता. तो एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील हद्दपार आरोपी आहे. फरार आरोपी सोनुसिंग हा सुप्रिम कॉलनी परिसरात आला अस्लयाची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहीतीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. महेद्रसिंग पाटील, पो.ना. सुधीर सावळे, सचिन पाटील, पो.कॉ. विशाल कोळी, मुकेश पाटील, सतिष गर्जे यांच्या पथकाला कारवाईकामी रवाना केले. या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याने गुन्हयात वापरलेला दांडका हस्तगत करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपी सोनुसिंग राठोड याच्याविरुद्ध यापुर्वी नऊ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. असे असतांना देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच असल्याचे दिसून आले आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.