महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – गांधीजींच्या जीवन चरित्राकडे व विचारांकडे डोळसपणे पाहिल्यास  आजच्या तरुणांसमोर महात्मा गांधी यांच्यासारखा दुसरा युथ आयकॉन नाही. त्यांच्या अंगी असलेला कणखरपणा व लोकनेत्यासाठीची योजकता आजच्या पिढीने अनुकरण करावी अशी आहे. असे मौलीक विचार जिल्हा पालीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी पुण्यतिथीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’च्या शुभारंगप्रसंगी उपस्थितांशी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, डीन गीता धर्मपाल उपस्थित होते.

सकाळी सात वाजता गांधी तीर्थच्या अॅम्फी थिएटर येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुरेश पाटील यांनी सर्वधर्म प्रार्थना व रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन सादर केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी उपस्थितांना स्वच्छता व सद् भावना शपथ दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार पुढे म्हणाले की, मला शालेय जीवनात महात्मा गांधीजींबद्दल अतिशय त्रोटक माहिती होती. मात्र महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या जीवनाबद्दल विस्तारानं अभ्यास केल्यानंतर त्यांची महत्ता कळली.  दक्षिण आफ्रिकेसारख्या नवख्या देशात त्याकाळी जाऊन काम करणे व तेथील प्रशासनाला अन्यायाला जाब विचारण्याचा कणखरपणा मला विशेष भावला. स्वातंत्र्य संग्रामतील त्यांचे योगदान मोलाचे होते. संवाद साधनांची मर्यादा असलेल्या त्याकाळात त्यांनी केलेली आंदोलने यशस्वी ठरली कारण हि आंदोलने वाऱ्यासारखी देशभर पसरत होती व त्यावर गांधीजींचे संपूर्ण नियंत्रण होते. त्यांच्या ठायी असलेले हे गुण अचंबित करणारे होते. गांधीतीर्थ येथील म्युझियमच्या माध्यमातून त्यांचे कार्य आजच्या युवापिढीपर्यंत त्यांच्या भाषेत व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गांधी फाऊंडेशन पोहोचवत आहे ही चांगली बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमा नंतर लगेचच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः राजकुमार आणि अशोक जैन यांनी काही अंतर स्वतः सायकल चालवून सहभागींना प्रोत्साहन दिले. तेरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत एकूण ३५ सायकल यात्रींचा सहभाग आहे.जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून हि यात्रा मार्गस्थ होणार आहे. सुमारे ३५० कि.मी.चे एकूण अंतर असेल. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला जाईल. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ३० जणांचा सहभाग आहे. ९ वर्षाचा नीर झाला, ७८ वर्षीय अब्दुलभाई, अमेरिकेतील मारिया व बंगलोर येथील ३ विद्यार्थ्यांचा यात्रेत समावेश आहे.

यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष स्वरुपाने बनविलेली ऐतिहासिक प्रदर्शनी प्रत्येक ठिकाणी लावली जाणार आहे. तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी गावकऱ्यांसाठी जाहीर कार्यक्रम नियोजीत आहेत यात निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा, व्याख्यान, खेळ, पथनाट्य व पपेट शोचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांना याप्रसंगी स्वच्छता व सद् भावना शपथ देण्यात येईल. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here