जळगाव : न्यायालयात तारिख वाढवून देण्याकामी अवघ्या दोनशे रुपयांची लाच घेतांना कौटूंबिक न्यायालयाचा सहायक अधिक्षक एसीबीच्या सापळ्यात अडकल्याची घटना आज जळगाव शहरात घडली. हेमंत दत्तात्रय बडगुजर असे लाच घेणा-या सहायक अधिक्षकाचे नाव आहे. जळगाव शहरातील बि.जे. मार्केट येथे हे कौटूंबिक न्यायालय आहे. ज्याठिकाणी न्याय दिला जातो त्या परिसरात अवघ्या दोनशे रुपयांची लाच स्विकारण्याची घटना घडल्याने आश्चर्यासह संताप देखील व्यक्त केला जात आहे.
या घटनेतील तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यात कौटूंबीक वाद सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर तक्रारदाराने त्याची पत्नी संसार करण्यासाठी परत यावी म्हणून कौटूंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. याउलट तक्रारदाराच्या पत्नीने तिच्या पतीविरुद्ध खावटीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यात तक्रारदाराने 85 हजार रुपयांची खावटी एकरकमी देण्याचा आदेश दिला आहे.
खावटीची एकरकमी रक्कम जमा करण्याकामी तारीख वाढवून देण्याच्या मोबदल्यात सहायक अधिक्षक हेमंत बडगुजर यांनी तक्रारदाराकडे दोनशे रुपयांची लाच मागितली होती. कौटुंबीक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ पंचासमक्ष दोनशे रुपये लाच स्वतः स्विकारतांना हेमंत बडगुजर यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहसापळा अधिकारी पो.नि. एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींनी या सापळा राबवण्याकामी सहभाग घेतला.