जळगाव : दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असून महिलेसह तिघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी बनावट महिला मालकीन तयार करुन खरेदी करुन देण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने फसला आहे. राजु जगदेव बोबडे रा.विटनेर विठ्ठल रुखमाई मंदिर ता.जि.जळगाव, प्रमोद वसंत पाटील, रा.विरावली ता.यावल जि.जळगाव, गंगा नारायण जाधव रा.कौतिकनगर मागे अयोध्या नगर जळगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
जळगाव शहराच्या अयोध्या नगर परिसरातील एक बखळ प्लॉट महिलेच्या नावावर आहे. ही महिला कामानिमित्त बाहेरगावी राहते. या मालमत्ताधारक महिलेएवजी बनावट महिला उभी करुन या तिन्ही प्लॉटची खरेदी करुन देण्याच्या तयारीत काही जण असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पुढील तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदिप सावळे, अभिलाषा मनोरे, पोना विजय पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी आदी कामाला लागले होते.
यापुर्वी अशा स्वरुपाचा गुन्हा करणारा राजु बोबडे हा बनावट महिला व साथीदारांसह ऑटो नगर परिसरातील संदिप हॉटेल जवळ उभे असल्याची गोपनीय माहिती पथकाला समजली. त्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता एक महिला व दोघे इसम त्या परिसरात उभे असल्याचे तपास पथकाला दिसून आले. हे.कॉ. विजयसिंग पाटील यांनी त्यांना ओळखल्याने त्यांना ताब्यात घेत पो. नि. किसनराव नजनपाटील यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.
जळगाव शहरात मालमत्ता असलेले मात्र कामधंद्यानिमीत्त परगावी राहणा-या लोकांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम राजु जगदेव बोबडे आणि प्रमोद वसंत पाटील हे दोघे जण करत असल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता पुरुषाच्या नावावर असल्यास बनावट पुरुष अथवा महिलेच्या नावावर असल्यास बनावट महिला उभी करुन बनावट आधारकार्ड /पॅनकार्ड तयार केले जात होते. करतात. समोरच्या व्यक्ती कडून कमी रक्कम घेवून बनावट खरेदी करुन दिली जात होती हे या घटनेतून उघड झाले आहे. अशा स्वरुपाची गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत दिसून आली आहे.
राजु जगदेव बोबडे याच्याविरुद्ध यापुर्वी एमआयडीसी, रामानंद नगर, जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासकामी तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. दत्तात्रय पोटे, सफौ संजय भांडारकर, हे.कॉ. सुनिल बडगुजर, रतन गिते, रविंद्र सोनार पुढील तपास करत आहेत.