जळगाव : ऑनलाईन व्यवहारात वेगवेगळया घटनेत महिला डॉक्टर व तरुणाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुरीयर कंपनीच्या ऑनलाईन मेंबरशीपसाठी सायका फारुख शेख (२६) या महिला डॉक्टरची १६ हजार ९०० रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुस-या घटनेत टी.व्ही.बुकींगची चौकशी करणा-या मिलिंद अशोक वानखेडे (रा.मुकुंद नगर,जळगाव) या तरुणाचा मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईल हॅक करुन ३९ हजार २८८ रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. सायका शेख यांचे मेहरुण परिसरात दवाखाना आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांनी आपल्या मोबाईवरुन डीटीडीसी कुरीअर कंपनीच्या मेंबरशिपसाठी ऑनलाईन फार्म भरला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मोबाईलवर एक कॉल आला. तुमची डीटीडीसी कुरियरची मेंबरशिप पूर्ण झाली आहे. तुमच्या मेंबरशिपचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठविला आहे असे पलीकडून सांगण्यात आले. तो क्रमांक पलीकडून विचारल्यानंतर डॉ. सायका शेख यांनी तो चार आकडी ओटीपी सांगितला. तो क्रमांक सांगितल्यानंतर लागलीच त्यांच्या बॅंक खात्यातून ९ हजार ९९९ आणि ७ हजार रुपये असे एकूण १६ हजार ९९९ रुपये कमी झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. याप्रकरणी डॉ. सायका शेख यांच्या फिर्यादीनुसार १५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
दुस-या घटनेत तरुणाने ऑनलाईन टी.व्ही. बुक केला होता. निर्धारित तारखेला टी.व्ही. मिळाला नाही म्हणून चौकशीसाठी ऑनलाईन साईटवर गेलेल्या मिलिंद अशोक वानखेडे या तरुणाचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यांच्या बॅँक खात्यातून दोन वेळा ३९ हजार २८८ रुपये ऑनलाईन वर्ग करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला फसवणूक व आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
.