जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 15 लाख रुपये घेत अधिका-याच्या नावे बनावट सहीचे बनावट नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगनाथ साहेबराव पाटील रा. बाळद रोड भडगाव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गेल्यावर्षी 9 मे 2022 पुर्वी हा प्रकार घडला आहे.
रंगनाथ साहेबराव पाटील यांचा मुलगा अक्षय रंगराव पाटील यास रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत संशयीत आरोपींनी त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले. त्यानंतर अक्षय याच्या नावाने बनावट अधिका-याच्या नावाने बनावट सहीचे नियुक्ती पत्र दिल्याचे उघडकीस आले. रंगनाथ पाटील यांनी संशयीतांना दिलेले 15 लाख रुपये तसेच झालेला खर्च 2 लाख असे एकुण 17 लाख परत मिळण्यासंदर्भात वकीलाकडून नोटरी करण्यात आली.
मात्र नोटरीप्रमाणे रंगनाथ पाटील यांना पैसे मिळाले नाही. संगनमताने फसवणूकीचा कट रचून खोटे दस्तावेज तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी धनराज किसनराव हाके रा. कमालवाडी जिल्हा लातूर, मुन्ना सोनिया कुवर (धंदा लबाड्या करणे) रा. वारस ता. साक्री जिल्हा धुळे, सुनिल बंडू मानकर व प्रतिभा बंडू मानकर (दोघांचा धंदा लबाडी करणे) रा. नाशिक, कदम (पुर्ण नाव माहिती नाही) रा. मुंबई अशा पाच जणांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.