जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौ-या दरम्यान पारोळा येथील जाहीर सभेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या चालक तरुणाच्या खिशातील तिस हजार रुपये लंपास झाल्याची घटना उघड झाली आहे. या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंचा जळगाव जिल्हा दौरा होता. या दौ-याप्रसंगी त्यांचे पारोळा या तालुक्याच्या ठिकाणी एन.ई.एस.हायस्कुलच्या पटांगणावर जाहीर सभा होती. या सभेला पारोळा तालुक्याच्या देवगाव तालुक्यातील सुनिल युवराज पाटील हा शेतकरी तथा चालक तरुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार श्रवण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होता.
सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास सभा सुरु असतांना जमलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुनिल पाटील या तरुणाच्या खिशातील तिस हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेत हात की सफाई दाखवली. आपली रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनिल पाटील याचे मन अस्वस्थ झाले. सभेतून प्रस्थान करत त्याने पारोळा पोलिस स्टेशन गाठले. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ.नाना पवार करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस दलाकडून नेहमीच केले जात असते.