जळगाव : अल्पवयीन मुलीचा तरुणाकडून विनयभंग होत असतांना घटनास्थळावर अचानक तिचा भाऊ आणि नातेवाईक आल्याने घाबरुन पलायन केलेल्या पिडीत मुलीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला संबंधीत तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षाची मुलगी शेतात बक-या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याजवळ राज राठोड नावाचा एक तरुण आला. त्याने तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य केले. त्याचवेळी मुलीचा भाऊ आणि नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. सर्वजण त्याला मारहाण करत असतांना आपल्याला देखील मारहाण होईल या भितीने घाबरुन मुलीने तेथून धुम ठोकली. घरी आल्यानंतर तिच्या आईने तिला प्रकार समजल्यामुळे शिवीगाळ सुरु केली.
त्यामुळे अजूनच घाबरलेल्या मुलीने घरातून शेतात पलायन करत शेत फवारणीकामी वापरण्याचे दृष्टीस पडलेले विषारी औषध प्राशन केले. दरम्यान तिच्या शोधात आलेल्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तिला उपचारार्थ जवाहर फाऊंडेशन धुळे येथे दाखल केले. याप्रकरणी मुलीने तरुणाविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास महिला फौजदार अक्षदा इंगळे करत आहेत.