जळगाव : दाखल गुन्ह्यात मदत करण्याकामी अगोदर वीस हजार नंतर तडजोडीअंती सोळा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस आणि पंटर असे दोघेही एसीबीच्या कारवाईत अडकण्याची घटना आज बोदवड येथे घडली. बोदवड पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले हे.कॉ. वसंत निकम आणि खासगी इसम एकनाथ कृष्णा बावस्कर अशी दोघांची नावे आहेत.
या घटनेतील तक्रारदार हे पत्रकार असून त्यांच्यावर व त्यांचे इतर तीन पत्रकार मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा चौघांविरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनला भादवि कलम-३८५, ३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास हे.कॉ. वसंत निकम यांच्याकडे होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी बोदवड पोस्टेला हे.कॉ. वसंत निकम यांची भेट घेतली होती. तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात मदत करून ‘ब’ फायनल पाठवण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी कार्यालय जळगाव येथे चॅप्टरसाठी न पाठवता तहसिल कार्यालय बोदवड येथे हजर करून चॅप्टर केस करुन देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदारांकडे अगोदर विस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. हे.कॉ.वसंत निकम यांच्या सांगण्यावरुन खासगी इसम एकनाथ बावस्कर यांना तहसिल कार्यालय बोदवड आवारात पंचासमक्ष लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोघांविरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एसीबीचे सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या सापळ्यात सहभाग घेतला.