मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी मुंबई परिसरात पावसाची संततधार सुरुच होती.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगामी २४ तासात अती मुसळधार पाऊस, तर मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट परिसरात दाट ढग असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार येत्या २४ तासांत सातारा, पुणे आदी घाट भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागात गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे मंगळवारी व बुधवारी मध्यम स्वरूपाच्या, तर गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारी दिवसभर मुंबईत पावसाची हजेरी कायम होती.