जळगाव : संशयातून घराला आग लावून संसारोपयोगी वस्तूंचे दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी दोघा महिलांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मिनी नारायण पाटील (चिंचखेडा खु ता. मुक्ताईनगर) असे फिर्यादी महिलेचे तर उषाबाई निवृत्ती मेनकार आणि सिंधूबाई सुपडा मेनकार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत.
आगीच्या या घटनेतील दोघा महिलांच्या परिवाराविरुद्ध वन विभागाने कारवाई केली होती. वन विभागाच्या कारवाईत आगग्रस्त परिवारातील पद्मिनी पाटील यांचा मुलगा शुभम याने मदत केल्याचा उषाबाई आणि सिंधूबाई या दोघा महिलांना संशय आहे. त्या संशयातून दोघा महिलांनी शुभमची आई पद्मिनी यांच्यासमवेत भांडण केले होते. तुमच्या कुटूंबाला कापून टाकू अशी धमकी आणि शिवीगाळ दोघा महिलांकडून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघा महिलांनी लावलेल्या आगीत पद्मिनी पाटील यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट, शोकेस, कॉट, गादी, कुलर व किचनमधील संसारोपयोगी सामान आदी वस्तू जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. संदिप दुनगहू करत आहेत.