जळगाव : कुरीयर डिसपॅच होण्यासाठी पलीकडून फोनवर बोलणा-या व्यक्तीने लिंकच्या माध्यमातून दोन रुपये पाठवण्यास सांगितल्यानंतर दुस-या दिवशी बँक खात्यातून 98 हजार 698 रुपये परस्पर वळते झाल्याची घटना चोपडा येथे उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी पाच रुपयांच्या बदल्यात सुमारे 80 हजार खात्यातून गायब झाल्याची घटना ताजी असतांना लागलीच दुसरी घटना घडली आहे. सतत होणा-या फसवणूकीच्या घटना घडत असतांना आणि त्या घटनांची माहिती प्रसिद्धी माध्यमातून जनतेसमोर येत असतांना लोक आपली फसवणूक करुन घेत असल्याचे देखील दिसून येत आहे.
खंडेराव माधवराव पाटील हे चोपडा येथील रामकुवर नगर भागातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मुलीसाठी तिरुपती कुरीयर चोपडा येथे मोबाईल पाठवला होता. मुलीला पाठवलेले मोबाईलचे पार्सल त्यांनी ऑनलाइन ट्रॅक केले असता त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. पलीकडून बोलणा-याने खंडेराव पाटील यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करुन माहिती भरुन दोन रुपये पाठवण्यास सांगितले.
पलीकडून बोलणा-यावर विश्वास ठेवत खंडेराव पाटील यांनी दोन रुपये पाठवले. पाटील यांची सर्व माहिती अर्थात डाटा मिळाल्यानंतर काही वेळाने पाटील यांच्या बँक खात्यातून 98 हजार 698 रुपये वर्ग झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीसह आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.