नाशिक : पुतणीच्या लग्नाला का आले नाही म्हणून महिलेने दोघा अल्पवयीन मुलांच्या मदतीने काठ्या मारुन पतीची हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवार वराडी येथे घडली. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून दोघा अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.
पुनमचंद शिवाजी पवार असे मयत इसमाचे नाव आहे. मालेगाव मनमाड रस्त्यावरील वरळी कुंदलगाव शिवारात पुनमचंद शिवाजी पवार हे पत्नी व दोघा मुलांसह रहात होते. पुनमचंद पवार याच्या पुतणीचे लग्न होते मात्र तो लग्नाला हजर राहीला नाही. त्यामुळे 18 मार्चच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास पुनमचंद यास त्याची पत्नी व दोघा अल्पवयीन मुलांनी काठ्यांनी मारहाण केली. यात पुनमचंद ठार झाला.
या घटनेप्रकरणी मयताचा भाऊ भाऊराव शिवाजी पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह तिच्या दोघा अल्पवयीन मुलांविरुद्ध चांदवड पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेस अटक करण्यात आली असून दोघा अल्पवयीन मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. महिलेस तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास चांदवड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव करत आहेत.