चार हजाराच्या लाचेत तिघा पोलिसांचा हिस्सा –– एसीबीच्या कारवाईत उघड झाला सर्व किस्सा

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : पत्त्याच्या क्लब सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सहायक फौजदारासह दोघे पोलिस नाईक अशा तिघांवर एसीबीच्या कारवाईची कु-हाड पडली आहे. सहायक फौजदारासह पोलिस नाईक यांचे प्रत्येकी दिड हजार आणि गोपनीय शाखेतील पोलिस नाईक याचे एक हजार अशी चार हजाराच्या लाचेची वाटणी एसीबीच्या कारवाईत उघड झाली आहे. एसीबीच्या सापळ्यात सापडलेल्या तिघांमुळे फैजपूर पोलिस स्टेशनचा कारभार बिसलरी वॉटरप्रमाणे स्वच्छ असल्याचा दावा फोल ठरला आहे.

 या घटनेतील तक्रारदाराचा यावल तालुक्यातील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. हा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदार हेमंत वसंत सांगळे आणि त्यांचे सहकारी पोलिस नाईक किरण अनिल चाटे या दोघांनी तक्रारदाराकडे एकुण चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. ठरल्यानुसार पत्त्याचा क्लब चालक तक्रारदार हे सहायक फौजदार हेमंत सांगळे आणि पोलिस नाईक किरण चाटे या दोघांची भेट घेण्यासाठी फैजपूर पोलिस स्टेशनला गेले होते.

सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी तक्रारदाराकडे कामाची व पैशाची बोलणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिस नाईक किरण चाटे यांना फोन लावून किती पैसे घ्यायचे याबाबत बोलणी केली आणि तक्रारदाराकडे फोन देवून आपसात बोलणे देखील करुन दिले. तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे यांच्याकडे देण्यास चाटे यांनी तक्रारदाराला सांगितले. त्या चार हजार रुपयांची विभागणी देखील उघड करण्यात आली. सहायक फौजदार आणि पोलिस नाईक यांचे मिळून तिन हजार आणि गोपनीय शाखेतील पोलिस नाईक महेश वंजारी याचे एक हजार असे एकुण चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.  

लाचेची चार हजार रुपयांची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी पंचासमक्ष स्विकारली आणि ती पोलिस नाईक महेश वंजारी यांचेकडे दिली. हा प्रकार घडताच दबा धरुन सापळा रचून बसलेल्या एसीबी पथकाने पुढील कारवाई केली. तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक  शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.ईश्वर धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here