महिला प्रवासी बघून टेम्पोचालकाचे सुटले भान-अत्याचार करतांना नराधमाने बुद्धी ठेवली गहान

टेम्पो-सह-ताब्यातील-आरोपी

सिन्नर : दुपारचे दोन वाजले होते. उन देखील कडक पडले होते. कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाऊन सुरु होते. त्यामुळे एस.टी.बसेस देखील बंद होत्या. अशा अवस्थेत पाच वर्षाच्या लहान मुलाला सोबत घेवून माया (काल्पनिक नाव) रस्त्यावर उभी राहून एखाद्या खासगी वाहनाची वाट बघत होती. तिला सिन्नर येथे बाजार करायला जायचे होते. खुप वेळ झाला तरी रस्त्याने सिन्नरच्या दिशेने जाणारे कोणतेही मिळत नव्हते.

हात दाखवून देखील काही वाहने  थांबत नव्हती. मायाच्या मनाची घालमेल सुरु होती. खुप वेळ झाला तरी सिन्नर येथे जाण्यासाठी वाहन मिळत नसल्यामुळे माया वैतागली होती. पाथरे वावी फाट्यावर माया उभी होती. तिला व तिच्यासोबत असलेल्या लहान मुलाला तहान लागली होती. मात्र पाण्याची देखील कुठे सोय नव्हती. तेवढ्यात तिला एक मालवाहु टेम्पो सिन्नरच्या दिशेने जातांना दिसला.

तिने त्या मालवाहू टेम्पोला हात दाखवून थांबण्याची विनंती केली. तिने हात दाखवल्यानंतर टेम्पो चालकाने टेम्पो उभा केला. दादा…..सिन्नरला जायचे आहे. असे तिने टेम्पो चालकाला म्हटले. टेम्पो चालकाने लागलीच तिला व तिच्या मुलाला बसवून घेतले. माया टेम्पोत बसली खरी मात्र पुढे नियतीने काय वाढून ठेवले आहे हे तिला माहितच नव्हते. टेम्पो चालकाच्या मनात तिला बघुन कामवासनेचा आगडोंब उसळला होता. माया दिसायला देखणी असल्यामुळेच टेम्पो चालकाने तिला तात्काळ बसवून घेतले. आपल्याला सिन्नर येथे बाजारासाठी तात्काळ जायचे एवढ्याच भोळ्या विचाराने ती टेम्पोत बसली होती.

तिला सिन्नर येथे बाजाराला जाण्याची घाई होती. तिचे मन साफ असले तरी टेम्पो चालकाचे मन साफ नव्हते. तिने त्याला दादा म्हटले तरी त्याच्या मनात वाईट विचार घुटमळत होते. आता लवकरच सिन्नर येणार व आपण आपण बाजार करु एवढाच भोळा भाबडा विचार मायाच्या मनात होता. खुप वेळाने का होईना आपल्याला वाहन मिळाले या विचाराने मायाला मनोमन आनंद झाला होता. मात्र हा आनंद तिच्या साठी क्षणीक ठरला. टेम्पो चालक तिच्या प्रत्येक अंगाकडे विक्षिप्त नजरेने बघत होता. त्यामुळे मायाला देखील विचीत्र वाटत होते.

त्यामुळे ती अंग चोरुन बसली होती. सिन्नर आल्यावर आपल्याला खाली उतरायचे एवढा एकच विचार तिच्या मनात होता.   सिन्नर येण्यास काही क्षण राहिले होते. मात्र टेम्पो चालक हा नराधम होता. त्याच्या मनात कुविचार होता. सिन्नर येताच मायाने टेम्पोचालकास दादा येथे थांबवा अशी विनंती केली. मात्र टेम्पो चालकाने ताब्यातील वाहनाचा वेग कमी करुन ब्रेक लावण्याएवजी अजून सुसाट वेगाने वाहन पुढे नेले. दादा इथे थांबवा … दादा येथे थांबवा मला उतरायचे आहे असे ती टेम्पो चालकाला विनवण्या करु लागली. सांगून देखील वाहन थांबत नसल्याचे बघून माया मनातून घाबरली.

तिचा पाच वर्षाचा मुलगा रडू लागला. आता काहीतरी विपरीत होणार याचा अंदाज मायासह तिच्या लहान मुलाला आला. मायाने हात जोडून टेम्पो चालकाला वाहन उभे करण्यास म्हटले. ज्या ठिकाणी तिला उतरायचे होते ते ठिकाण मागे पडले होते. तीने आता मागे पायी पायी जाण्याची मानसिकता केली होती. मात्र टेम्पो चालक त्याचे वाहन थांबवण्यास तयारच नव्हता. मायाला बघून त्याच्या मनातील वासनेचा कुविचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. या कुविचारानेच त्याला घेरले होते. एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाशिक सिन्नर महामार्गावर हॉटेल नाना ढाबा परिसरातील घाटात निर्मनुष्य जागी त्याने वाहनाचे करकचून ब्रेक लावले.

ब्रेकच्या कर्कश आवाजात गाडी जागेवरच थांबली. या सर्व घटना बघता आता काहीतरी विपरीत होणार याचा नेमका अंदाज मायाला आला होता. ती देवाला या संभाव्य संकटातून  वाचवण्यासाठी वारंवार मनोमन विनवणी करत होती. निर्जन ठिकाणी गाडी उभी केल्यानंतर वाहनचालकाने मायासोबत तिच्या पाच वर्षाच्या मुलासमोरच लगट करण्याचा प्रयत्न सुरु केला. मायाने त्याला कडाडून विरोध केला.

मात्र त्याच्या मनातील कुविचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याने तिचे तोंड दाबून तिच्या मुलासमक्ष तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिच्या पाच वर्षाच्या मुलाच्या बाल मनावर या घटनेचा होणारा परिणाम केवळ त्या मातेला दिसत व समजत होता. मात्र या नराधमाला त्याचे काही सोयरसुतक नव्हते. त्याने तिच्या मुलासमक्ष मायाचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. आपली कामवासना पुर्ण झाल्यानंतर त्या टेम्पोचालक नराधमाने दोघा मायलेकांना गाडीच्या खाली उतरवून देत वाहनासह पलायन केले. भर दुपारी निर्जन रस्त्यावर दोघे मायलेक धाय मोकलून रडत होते.

हा वाईट प्रसंग त्या पाच वर्षाच्या बालमनावर कायमचा कोरला गेला. या प्रसंगादरम्यान त्या वाहनाचा क्रमांक टिपण्याची बुद्धी तिला व तिच्या मुलाला सुचली नाही. त्या बालकाला आपल्या आईवरील अत्याचाराचे दृश्य बघण्याची दुर्दैवी वेळ आली होती. वाहनाचा क्रमांक टिपण्याची वा लक्षात ठेवण्याचे त्या बालकाचे वय देखील नव्हते. दोघेही मायलेक घाबरले होते. त्यामुळे वाहनाचा क्रमांक टिपण्याचे काम त्या मातेकडून झालेच नाही. मायाला मोठ्या प्रमाणात वेदना होत असल्यामुळे ती कशीबशी एका खासगी रुग्णालयात दाखल झाली.

या प्र्काराची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना कळवली. एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस तिचा जवाब घेण्यास दवाखान्यात दाखल झाले. आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिने पोलिसांजवळ कथन केला. तिने दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.233/20 भा.द.वि.376 नुसार फरार टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

या दाखल गुन्हयाची नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी अतिशय प्रखरतेने दखल घेतली. त्यांनी एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक रहाटे यांना या गुन्हयाबाबत लवकरात लवकर छडा लावण्याचे निर्देश दिले. पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर , डीवायएसपी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अशोक रहाटे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. पो.नि. अशोक रहाटे यांनी आपली तपास चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

दिवसरात्र एक करुन शिर्डी नाशिक महामार्गालगतच्या शिंदे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रीक माहितीच्या आधारे या गुन्हयातील टेम्पोचा क्रमांक शोधून काढण्यात अखेर तपास पथकाला यश आले. पो.नि. अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक गोकुळ लावणे, पोलिस नाईक तुषार मरसाळे, पोलिस नाईक सुदाम धुमाळ, पोलिस हवालदार प्रतापसिंग ठाकुर, पो.कॉ. सुनील जाधव यांच्या पथकाने टेम्पो चालक प्रदीप विनोद काळे यास औरंगाबाद जिल्हयातून शिताफीने ताब्यात घेतले.

तो औरंगाबाद जिल्हयातील भाबर्डी पोस्ट दुधड येथील रहिवासी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ चार दिवसात या गुन्हयाचा तपास लावण्यात सिन्नर एमआयडीसी पोलिस पथकाला यश आले. या तपासाचे नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी कौतुक केले आहे. आरोपी प्रदिप काळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here