जळगाव : विना क्रमांकाच्या मोटार सायकलने विवाहीतेचा पाठलाग करुन तिला “चलती क्या खंडाला” असे म्हणत तिचा विनयभंग करणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम उर्फ टीपू उर्फ टिप्या सत्तार मण्यार असे भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
इब्राहीम उर्फ टिप्या याने त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या मोटार सायकलने एका विवाहीतेचा वराडसीम बस स्थानक परिसरात सतत पाठलाग करण्याचे काम सुरुच ठेवले होते. मोटार सायकलने विवाहितेच्या अगदी जवळ जावून “चलती क्या खंडाला” असे म्हणून त्याने तिचा विनयभंग केल्याची घटना 4 मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. याशिवाय विवाहीतेकडे बघून शिटी मारणे, हाताने इशारे करुन गाणे म्हणणे आदी प्रकाराला वैतागून विवाहीतेने भुसावळ तालुका पोलिस स्टेशन गाठत टीपू विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार करत आहेत. टिपूला अटक करण्यात आली आहे.