जळगाव : एका घटनेत 2 लाख आणि दुस-या घटनेत 5 लाख खंडणी मागितल्याप्रकरणी अनुक्रमे जळगाव तालुका आणि बोदवड पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका घटनेत शेतक-याकडे दुस-या घटनेत डॉक्टरकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात भगवान भावलाल कोळी हे शेतकरी फिर्यादी आहेत. अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत भगवान कोळी हे 9 एप्रिल रोजी घरी असतांना अनिल कोळी आणि सचिन सोनवणे हे दोघे त्यांच्याकडे आले. तुझा भाऊ बिल्डरशिपचा व्यवसाय करतो. तु देखील आता कपाशी आणि गहू विकला आहे. तुझ्याकडे जास्त पैसे असून तुझा भाऊ अंगावर सोने घालून फिरतो. आम्ही त्याला एखाद्यावेळी बंदूकीच्या गोळ्या घालून ठार करु. त्याच्या अंगावरील सोने लुटून नेवू. तुला तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसात आम्हाला दोन लाख रुपये दे अशी धमकी भगवान कोळी यांना देण्यात आली. आम्ही आत्ताच एका दरोड्याच्या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आलो आहोत. आमचे कुणी काही वाकडे करु शकत नाही. अशी धमकी देखील दोघांनी कोळी यांना दिली. या दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. वासुदेव मराठे करत आहेत.
दुस-या घटनेत बोदवड येथील यशपाल समाधान बडगुजर हे डॉक्टर फिर्यादी आहेत. या डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्याने रुग्णास कॅन्सर झाल्याचा आरोप करत तिघांनी डॉक्टरला धमक्या दिल्या. या घटनेत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार सुधाकर शेजोळे करत आहेत.