जळगाव : पंधरा फोटो फ्रेमची ऑनलाईन ऑर्डर देणा-या दोघांनी पेमेंट घेण्याच्या नावाखाली महिलेस डबल पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुसावळ तालुक्यातील खडका येथील महिला बळी पडली. दुप्पट पैसे मिळवण्याच्या नादात 1 लाख 20 हजार रुपये गमावून बसलेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील खडका येथे सौ. माधुरी पाटील यांचा रेसीन आर्ट या नावाने फोटो फ्रेम तयार करण्याचा व्यवसाय आहे. सौ माधुरी पाटील यांना मोबाईलवर व्हाटस अॅप कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून मनजीतसिंग आणि संदीपकुमार शर्मा अशी नावे सांगणा-या दोघांनी पंधरा फोटो फ्रेमची ऑर्डर दिली. या फ्रेमच्या कामाचे पेमेंट 20 हजार 495 रुपये सौ. पाटील यांनी मागीतले असता पलीकडून दोघांनी त्यांना एक कुपन पाठवले.
ते कुपन सौ. माधुरी पाटील यांना स्कॅन करण्यास सांगण्यात आले. कुपनच्या माध्यमातून सौ. पाटील यांना पाठवण्यात आलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बहाण्याने सौ.पाटील यांच्याकडून दोघांनी 1 लाख 20 हजार रुपये घेतले. 1 लाख 20 हजार रुपये मिळाल्यानंतर दोघांनी पलीकडून प्रतिसाद देणे बंद केले. सौ.पाटील यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. याप्रकरणी फसवणूकीसह सायबर कायद्यानुसार दोघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे करत आहेत.