नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे पत्र लिहून एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
एका सोळा वर्षाच्या मुलीने 14 ऑगस्ट रोजी स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली आहे. संभळ येथे ही घटना घडली. मुलीने आत्महत्या करण्यापुर्वी पंतप्रधान मोदींना 18 पानी पत्र लिहिले. हे पत्र वाचून सर्वच जण थक्क झाले. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि समाजाला त्रासदायक काही लोकांना कंटाळून या मुलीने आपली जीवनयात्रा संपवल्याचे म्हटले जात आहे. या सर्व बाबींचा उल्लेख तिने या पत्रात केला आहे.
मुलीच्या आत्महत्येनंतर तपासात पोलिसांना पंतप्रधान यांच्या नावे लिहिलेले अठरा पानांचे एक पत्र मिळाले. या पत्रात मुलीने वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर चिंता व्यक्त केली आहे. दिवाळीत वाजवले जाणारे फटाके यासह होळीसाठी वापरले जाणारे केमिकल युक्त रंग यावर बंदी घालण्याची मागणी आत्महत्या करणा-या मुलीने पत्रात केली आहे.