एप्रिलमध्येच जाणवतो मे हिट. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय कोणत्याही क्षणी येणार. राजकारण्यांसह जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. काय होणार एकनाथ शिंदेंचे? 16 आमदारांचं? शिंदे फडणवीस सरकार टिकत की जातंय? काही महिन्यापासून खोकेवाले गाजताहेत. सुरत गुवाहाटी – गोवा – जंगल – झाडी – डोंगरची मस्तीभरी हवा भ्रष्टाचाराची वावटळ उठून गेली. शिंदे यांचे सरकार पडलच तर कसं पडू शकतं आणि तरलच तर कस तरणार? यावर सोशल मीडिया पंडितांच्या समीक्षकांच्या भविष्यवाणीचा सुकाळ. “पहाटेचा शपथविधी अडीच वर्षापासून अजूनही मनातून जाण्याचं नाव घेईना. महाराष्ट्रात भाजप – सेना युती फोडून महाविकास आघाडी सत्तेचा सीजन एक पाहून झाला. दिल्ली अधिक फडणवीशी चातुर्याने शिवसेना फोडून शिंदेशाहीचा सिझन टू लोकांनी अनुभवला. कर्नाटकात विधानसभा निवडणूक घमासान. भाजप चाणक्यांचे मुंबई दौरे. नजर महाराष्ट्रापेक्षा लोकसभा 2024 जिंकण्यावर. त्यासाठी राज्यात 200 आमदार, 45 खासदारांची भाजपची घोषित टारगेट्स. जिंकण्यासाठी वाटेल ती शिष्ट – अनिष्ट – कपटनीती – कारस्थाने ही आयुधे. दुसऱ्याच पक्षातले आमदार – खासदार आपल्या “गोटा”त खेचून आणण्याचे सिद्ध केलेले कौशल्य. ठाकरे सरकार घालवल्यावर मविआ वज्रमुठ विरुद्ध भाजपात जुंपलेले शब्दयुद्ध.
वज्रमुठधारी नेत्यांच्या मालेगाव, नाशिक, संभाजीनगर, नागपूर महासभांमधून भाजपवर आग पाखड करणारी वक्तव्ये. मालेगाव आणि संभाजीनगरच्या सभांमधून उद्धव ठाकरे यांचा प्रचंड वाढलेला आत्मविश्वास. संधी येताच यावेळी विरोधकांना अंगावर घेऊन जमिनीवर आदळण्याऐवजी “सेफ डिस्टन्स” वर कोण? याकडे कटाक्षाने माध्यमांचा नित्याचा पहारा. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे हाय प्रोफाईल नेते माजी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार या आठवड्यात गाजले. पंधरवड्यापूर्वीपासून उद्धव ठाकरे गाजताहेत. राज ठाकरे ही गाजले. दोंन्ही ठाकरे बंधूंची “हिंदुत्व” लाईनवर दावेदारी. भाजपा हे हिंदुत्वाचा मोठा दावेदार. नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र, राज्यातील भाजप नेते सत्तारूढ सरकारी आणि आरएसएसला निशाण्यावर घेतले. नागपूरच्या होम पिचवर आरएसएस प्रमुखांना जाहीरपणे प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांनी दाखवली. नाना पटोले (कॉंग्रेस) यांनी ज्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले त्यासाठी 300 किलो आरडीएक्स नागपूरातून गेल्याचा उल्लेख केला. प्रतिस्पर्ध्याला फाडून खाण्याची नामी संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीवरचा शतकवीर बाराव्या खेळाडू सारखा संथ बसून राहिला ही बाब चाणाक्ष माध्यम विश्लेषक सुज्ञ जनता यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यातून राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव त्या पक्षातल्या जुण्या मित्रांच्या साथीने भाजप सीजन टू खेळत नाही ना? यावर माध्यम प्रतिनिधींनी फोकस लावला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात शिंदे गटाला तडाखा बसलाच तर भाजप पर्यायी बेगमी तयार ठेवण्यात गाठील राहणार नाही हे ओळखण्याएवढे राजकीय नेत्यांइतकेच माध्यमकर्मी सावध आहेत. 2019 मध्ये फडणवीसांच्या तोंडचा सत्तेचा घास पळवण्यात आघाडीवर असलेले सामनावीर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीवर रविवारच्या रोखठोकीत सोनाराने कान टोचावे तशा कान टोचण्या केल्या. हे राऊत खासदार, पत्रकार आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते देखील आहेत. शिवाय पत्रकारांना बातम्यांचा शंभर किलोमीटर वरूनही वास येतो म्हणतात. कोकणी हापूस आंब्याचा सुगंध साठवण्याची वृत्ती थेट कोकण ते नागपूर पर्यंत सारखीच. पोलीस जसे गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी बघून तसलेच गुन्हे करण्याचे रेकॉर्ड असणाऱ्या सराईतांना उचलून आणतात किंवा रात्रीच्या गस्तीत संशयीतांना दरोडा टाकण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली इंट्रोगेशन (खोलवर तपासणी) साठी पकडतात. त्याच पद्धतीने राजकीय पक्ष नेते, हितचिंतक देखील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्व – पक्षातल्या महत्त्वकांक्षी त्यात क्षमता दाखवून असलेल्या नेत्यांवर लक्ष ठेवून असतात.
अजितदादा हे याच पठडीतले. मुख्यमंत्री पदाचे सोनेरी स्वप्न बाळगून असलेले. फडणवीसांची दुसऱ्यांदा संधी हुकली. एकनाथ शिंदे यांची लॉटरी लागली. सत्ता संघर्षाचा निर्णय दृष्टीपथात येताच भाजपासह शिंदेशाहीत जवळपास साठ आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सोळा आमदारांचा अपात्रतेने शिंदे सरकारसह त्यांचे आजवरचे कामकाज बेकायदा ठरते काय? याची चर्चा सुरू झाली आहे. अजित दादा पवार हे राजकारणातली मोठी हस्ती. तडाखेबंद कार्यशैलीसाठी प्रसिद्ध. पण पहाटेच्या शपथविधीमुळे हा तगडा गडी भाजपवाल्यांना जवळचा वाटू शकतो. शिंदे गटवाल्यांनी अद्याप भाजपात प्रवेश केला नाही. तसे करताच ते सारे दिल्ली महाशक्तीच्या पंखा खाली जातील. जुन्या काळातले जहागीरदार. पंचहजारी, दसहजारी, मनसबदार बनतील. त्यामुळेच या सर्वांना धाब्यावर बसवणारी खेळी म्हणजे आणखी एकदा राजकीय पक्ष फोडीचा सिझन तीन. हा सीझन तीन तडीस नेणारे देवेंद्र फडणवीस सध्या राजकीय पटलावरून गायब दिसतात. या खेळात भाग घेणारे संभाव्य खेळाडू दिव्यदृष्टीवाल्या संजयजींनी हेरून राजकीय पडद्यावर एक्स्पोज करण्याचा डाव टाकताच “खाशीस्वारी” भडकली. तुझ्या ताटातला तेवढा खा. उगाच इकडे का डोकावतोस? म्हणून दणकावलं. तरीही संभाव्य हालचालींचा वेध घेणाऱ्या अटकळबाजीच्या न्यूज देवून उद्या कोणत्या क्षेत्रात काय घडू शकते हे आपल्या वाचकांना सांगणे हे पत्रकारांचे कामच आहे. त्यासाठी तर्कशास्त्र, घटनाक्रम, नेत्यांच्या हालचाली, देहबोलीचा तपशील दिला जातो. अगर धुवा दिखाई दे तो वहा आगको होणाही चाहीये असे तर्कशास्त्र मांडले जाते.
लेखी पुरावे हाती लागतात तेही छापले जातात. सोशल मीडिया जागृत आहे. राज्याची लोकसंख्या 15 कोटी आणि लोकांच्या हाती वीस कोटी मोबाईल सांगितले जातात. 130 कोटी लोकसंख्येची 80 ते 85 टक्के संपत्ती केवळ 20 टक्के उद्योगपतींच्या हातात जात असेल तर उरलेल्या 15 टक्के लोकांनी गप्प का बसावे? या जनतेला कोण न्याय देणार हा लोकांचा प्रश्न आहे. अजितदादांचा युक्तिवाद बिनतोड आहे. “जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार” इतके ते स्पष्ट बोलले. तरी पुण्यातल्या लोकमत शी बोलताना त्यांनी राकॉ सोडण्याचा इन्कार करतांनाच “भविष्यात भाजपासोबत जाण्याबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असेही स्पष्ट केले. म्हणजे भाजपकडे जाण्याच्या भुमिकेचा बॉल थोरल्या साहेबांच्या कोर्टात टोलावलाय. जुने लोक म्हणत असत की, “ज्या गावाला जायचेच नाही तो रस्ताही विचारु नये”. इथे मात्र चतुर खिलाडी सर्व पर्याय खुले असे संकेत देताहेत. वृत्तपत्रे, पत्रकार, समीक्षक, विश्लेषक यांनी मांडलेल्या भूमिका पोषक असल्या तर ते चांगले. आणि यांचे अंतस्थ हेतू कार्यभाग तडीस नेण्यापूर्वी भांडे फोडले तर ते सारे आधुनिक “नारद मुनी” (कळलावे) हे कसे?
राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय घोषित झाल्यावर सत्ता-कारणाचा सीजन फोर आकाराला येईल. त्यासाठी विधानसभेच्या 185 ते 200 आणि लोकसभेसाठी सध्याच्या बेचाळीस मध्ये तीन ची भर घालून 45 जागांची टार्गेट्स घेऊन मंडळी मैदानात उतरेल. उद्धव ठाकरे म्हणताहेत बहुदा भाजपशी मला एकट्याने लढावा लागेल. म्हणजे या युद्धात, “तुम लढो हम कपडे संभालते” अशी ही मंडळी आहे तर! वज्रमुठ भाजपाच्या टाळक्यात हाणण्याच्या घोषणा आहेत. ती महाविकास आघाडीच्या डोक्यावर न आदळो ही सदिच्छा.