नवी मुंबई : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरेलेले हातमोजे नव्याने वापरात आणले जात होते. अशा जुन्या हातमोज्यांची नव्याने विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून जुना व नवा असा एकुण चार क्विंटल हातमोज्यांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सीबीडी सेक्टर 9 येथे राहणारा प्रशांत अशोक सुर्वे हा पावणे येथे जुन्या हातमोज्यांना धुवून पुन्हा विक्रीसाठी पॅकिंग करत होता. त्याच्या या व्यवसायाची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एक चे सहायक निरीक्षक राहुल राख यांना समजली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल राख, रुपेश नाईक, हर्षल कदम, भगवान तायडे, रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी गामी इंडस्ट्रियल पार्क परिसरातील गाळा क्रमांक 29 व 80 येथे छापा टाकला.त्याठिकाणी पोलिसांना नवे व जुने असे जवळपास 4 क्विंटल वैद्यकीय हातमोजे दिसून आले.
तसेच या ठिकाणी दोन वॉशिंग मशीन, ब्लोअर मशीन देखील आढळले. या सर्व एवजाची किंमत किंमत 6 लाख 10 हजार अशी आहे. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले हातमोजे त्याच्यामार्फत संकलीत केले जात होते. जुन्या हातमोज्यांना वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यानंतर ते पुन्हा विक्रीसाठी नव्या बॉक्समधे पॅक केले जात होते. आतापर्यंत असा प्रकार कित्येक वेळा झाला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वापरलेले हातमोजे नष्ट करणे आवश्यक असतांना संबंधीतास हे हातमोजे कोण पुरवत होता याची माहिती समोर आली नाही.