जळगाव : लग्न जमवून देण्याच्या भुलथापा देत 55 हजार रुपयात फसवणूक करणा-या तिघांना पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. देविदास चिंधा महाले(माळी) रा. वरझडी ता शिंदखेडा जिल्हा धुळे, रमेश भटा पावरा रा. साबलापानी ता शहादा आणि शिवाजी उर्फ रोहिदास भूकल्या ठाकरे रा. चिरडे ता. शहादा जि. नंदुरबार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याशिवाय फसवणूक करण्यात आलेली 55 हजाराची रक्कम देखील तिघांकडून हस्तगत करण्यात आली आहे.
या घटनेतील पारोळा येथील रहिवासी तथा लग्न करण्यास इच्छुक असलेले भीमराव सीताराम महाजन यांना त्यांचे नातेवाईक देविदास चिंधा महाले (माळी) यांच्यासह तिघांनी मिळून 7 जुलै 2021 रोजी एका कन्येचे स्थळ दाखवले होते. ते स्थळ योग्य वाटल्यानंतर तिघांनी भिमराव महाजन यांच्याकडून सोने व कपडे घेण्यासाठी 55 हजाराची रक्कम घेतली. त्यानंतर लग्न पार पाडले नाही तसेच घेतलेली 55 हजाराची रक्कम देखील परत दिली नाही.
याप्रकरणी तिघांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. योगेश जाधव, किशोर भोई, पो. कॉ. राहुल कोळी आदींनी तपास करुन तिघा संशयीत आरोपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून फसवणूक केलेली पुर्ण रक्कम देखील हस्तगत करण्यात आली. ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी भिमराव महाजन यांच्या सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पो. ना. योगेश जाधव, कारकून पो. ना. आम्रपाली पालवे आदी हजर होते. लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-यांची यापुढेही गय केली जाणार नसून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे पो.नि. रामदास वाकोडे यांनी म्हटले आहे.