कोची : केरळमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदाराने एक खळबळजनक ऑफर जाहीर केली. या ऑफरमुळे त्याच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली. मात्र या धक्कादायक आणि वादग्रस्त ऑफर प्रकरणी एका वकील महोदयांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या वादग्रस्त जाहिरातीनुसार दुकानातून वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 24 तासांत कोरोनाची लागण झाल्यास 50 हजार रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. या कॅशबॅकमधून जीएसटीचीही सुट देण्यात आल्याचे दुकानदाराने जाहिरातीत म्हटले आहे.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विक्रेते विविध आमिषाच्या ऑफर्स जाहिरातीच्या माध्यमातून देत असतात. केरळमधे अशाच एका वादग्रस्त ऑफर्सच्या जाहिरातीची चर्चा सुरु आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून वस्तूची खरेदी केल्यानंतर 24 तासांत कोरोनाची बाधा झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक मिळणार असल्याचे म्हटले आहे. 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान ठेवण्यात आलेल्या या ऑफरची जाहिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डीजीटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रसिद्ध करण्यात आली. या वादग्रस्त जाहिरातीविरुद्ध अॅड. बिनू पुलिक्कांदम यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.
कॅशबॅकच्या ऑफरच्य लालसेपोटी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आपला आजार लपवून दुकानात खरेदीसाठी जावू शकतात. त्यानंतर कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे सांगून कॅशबॅकची मागणी करु शकतात. त्यामुळे ही जाहिरात बेकायदा व दंडणीय असल्याचे अॅड. बिनू पुलिक्कांदम यांनी मुख्यमंत्री महोदयांना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे.