गेल्या काही दिवसांपासून आकाशाला भिडलेले सोन्याचे व चांदीचे दर घसरत आहेत. रशिया व चीनची कोरोना लस आली असून सध्या गुंतवणूकदार खरेदी केलेले सोने विकत असल्याचे दिसून येत आहे. चांदीमधून देखील कित्येक जण आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या व चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
सकाळी बाजार उघडताच सोन्याचा दर 300 रुपयांनी घसरला आणि तो 52,320 प्रति 10 ग्रॅम असा झाला. दुपारी दोन वाजता सोन्याच्या दराने 51850.00 रुपये एवढी पातळी गाठलेली आहे. दरम्यानच्या काळात सोन्याचा भाव 51721.00 रुपये एवढा झाला होता. चांदीच्या भावात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आता चांदीचा भाव 1184.00 रुपयांनी प्रति किलोप्रमाणे कमी झाला आहे. चांदी सध्या 66763.00 रुपयांवर आली आहे. सकाळच्या वेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 67998 रुपये असा होता. दरम्यानच्या काळात चांदीचा भाव 66401.00 रुपये असा होता.
बुधवारी सोन्याच्या भावात 750 रुपयांची घट झाली होती. तसेच चांदीच्या भावात 1400 रुपयांची घट झाली होती. आता सोन्याने 56,191 रुपयांकडे वाटचाल करत दोलायमान परिस्थिती निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरम्यानच्या काळात सोन्याच्या भावात 3.5 टक्के घसरण झाली. आज हाजिर सोन्याचा भाव 0.5 टक्क्यांनी वाढला. तो भाव 1,940 डॉलर प्रति औंस झाला होता.