कंपनीत चोरी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : एमआयडीसी परिसरातील कंपनीत चोरी करणा-या तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. देवानंद उर्फ देवा गोकुळ कोळी (रा. स्वामी समर्थ मंदीरा जवळ, कुसुबा – जळगाव),  विक्की आत्माराम कोळी (रा. दुर्गादेवी मंदीरा जवळ सावदा ता रावेर ह.मु. स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव) आणि,  ईश्वर श्रवण महाजन (मुळ रा. कुसुबा ता. रावेर ह.मु. स्वामी समर्थ, केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरुण – जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

 एमआयडीसी परिसरातील एचडी फायर प्रोटेक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंडच्या भितीखालची माती काढून तिघांनी 2 व 3 मे च्या मध्यरात्री कंपनीत शिताफीने प्रवेश केला होता. या कंपनीतील सुमारे 1 लाख 45 हजार 300 रुपये किमतीच्या सामानाची तिघांनी चोरी केली होती. या घटने प्रकरणी  कंपनीचे सिनीयर मॅनेजर मोहन बलवंत कुलकर्णी यांनी अज्ञात चोरटयांविरुध्द दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासाअंती हा गुन्हा या तिघांनी केल्याचे पो.नि. जयपाल हिरे यांना समजले. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, ललीत नारखेडे आदींना कारवाई कामी रवाना केले. पथकातील पोलिस कर्मचारी वर्गाने चोरट्यांना कुसुंबा आणी रामेश्वर कॉलनी परिसरातून रात्री ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेतील तिघांनी आपला गुन्हा कबुल केला.

अटकेतील देवानंद गोकुळ कोळी हा याच कंपनीमध्ये यापुर्वी मजुरीचे काम करत होता. त्यानेच या चोरीची व्युहरचना आखली होती. तिघांना न्या. श्रीमती जे. एस. केळकर याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. श्रीमती रंजना पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here