जळगाव : जळगाव येथील स्टेट बॅंकेतून रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांच्या जबरी चोरी प्रकरणी निलंबीत पोलिस उप निरीक्षकाचा सहभाग उघड झाला आहे. या जबरी चोरीत बॅंकेचा रोजंदारी कर्मचारी, त्याचा निलंबीत पोलिस उप निरीक्षक मेहुणा आणि मेहुण्याचे वडील अशा तिघांना या गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे. मनोज रमेश सुर्यवंशी (स्टेट बँक रोजंदारी कर्मचारी), त्याचा मेहुणा शंकर रमेश जासक (कर्जत जिल्हा रायगड येथील निलंबीत पोलिस उप निरीक्षक) आणि रमेश राजाराम जासक अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अहोरात्र मेहनत घेत जळगाव पोलिस दलाने तिस-या दिवशी या गुन्ह्याची उकल केली आहे.
1 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील स्टेट बॅक शाखेत जबरी लुट झाली होती. या घटनेत 6015.84 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 60 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागीने आणि 17 लाख 10 हजार 370 रुपये रोख जबरीने लॉकरमधून हिसकावून नेण्यात आली होती. यापैकी सोन्याचे दागीने पुर्णपणे हस्तगत करण्यात आले असून रोख रकमेत सुमारे सत्तर हजार रुपये कमी आहेत. अटकेतील संशयीतांनी ती रक्कम कुठे खर्च केली त्याचा तपास सुरु आहे.
जळगाव येथील स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या कालिंका माता मंदीर शाखेत मनोज रमेश सुर्यवंशी हा करार पध्दतीने ऑफीस बॉय म्हणून कामाला होता. ऑफीस बॉय असल्यामुळे त्याला बॅंकेच्या सर्व भागाची आणि कामकाजाची माहिती होती. त्याने त्याचा मेहुणा शंकर रमेश जासक आणि मेहुण्याचे वडील रमेश राजाराम जासक अशा तिघांनी मिळून बॅंकेत जबरी चोरीचा प्लॅन आखल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटने प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला बॅक व्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 93/23 भा.द.वि. 394 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचा कंत्राटी कर्मचारी मनोज सुर्यवंशी, फिर्यादी बँक व्यवस्थापक आणि इतर कर्मचा-यांची वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांनी विचारपूस केली. त्यात सर्व कर्मचारी आणि मनोज सुर्यवंशी याच्या बोलण्यात तफावत आढळून आली. मनोज सुर्यवंशी याच्यावरील पोलिसांचा संशय बळावला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. मनोज सुयवंशी याने त्याचा मेहुणा शंकर जासक, त्याचे वडील रमेश जासक अशा तिघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुल केले. जबरी चोरीतील लुटून नेलेले सोन्याचे दागीने व पैसे मेहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे घेवून गेले असल्याचे त्याने कबुल केले.
जळगाव शहरातील सर्व पोलिस स्टेशनमधील पोलिस पथक या तपासकामी अहोरात्र मेहनत घेत होते. त्यात त्यांना यश आले. पोलिस अधिक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदिप गावीत, प्रशिक्षणार्थी डिवायएसपी सतिष कुलकर्णी, आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. शंकर शेळके, पोलिस उप निरिक्षक गणेश वाघमारे, पोलीस उप निरीक्षक प्रदिप चांदेलकर, पोउनि मुबारक तडवी, हे.कॉ. परिष जाधव, राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीष पाटील, अश्वीन हडपे, अभिजीज सैंदाणे, सुनिल पवार, इंगळे आदींचे पथक याकामी तैनात होते. अटकेतील पोलिस उप निरीक्षक शंकर जासक हा रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर 2021 पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजुन आले आहे.