जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) – धुम्रपानापासून दूर राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, ध्यान करावे आणि दीर्घश्वसन करावे या त्रिसुत्रीमुळे धुम्रपान असो वा मद्यपान त्यापासून आपली सुटका करून घेता येते याबाबत मोलाची माहिती जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी दिली. जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेधदिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी ११ लाख लोकांचा मृत्यू होतो. ५ लाख लोकांचा मद्य सेवनामुळे दरवर्षी मृत्यू होतो याबाबतची भीषणता त्यांनी सांगितली.
याबाबत जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शनात सांगितले की, जगभर तंबाखूजन्य पदार्थ सेवन, धुम्रपान व व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. भारतामध्ये घराघरात तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. हा पदार्थ जणू राष्ट्रीय खाद्य पदार्थच आहे. तंबाखू व्यसनाचे मुख्य कारण म्हणजे अनुकर होय. घरात आपले वडील,आई हे तंबाखू खातात, सिगारेट पितात त्यामुळे ते अपायकारक नाही असा समज घरातील मुलांचा होतो. झोप आणि प्रेमाच्या कमतरतेमुळे देखील व्यसनाधिनतेचे कारण होय. घरातील आपले ज्येष्ठ हे पदार्थ सेवन करतात या अनुकरणाने हे व्यसन जडते हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी भाषणात नमूद केले. भारतातल्या व्यसनाधिनतेमुळे जनुकीय बदल होत आहेत हा सर्वात मोठा दुष्परिणाम सध्या दिसत आहे. शुक्राणूंची संख्या कमी होत चालली आहे, भावी पिढी ही अशक्त जन्माला येत आहे. या समस्यांना सामोरी जावे लागत आहे. ४०० एकर शेतजमीन तंबाखू लागवडीसाठी वापरात येते त्या ऐवजी फळबागा करून फलोत्पादन केले तर सुदृढता निर्माण होईल. व्यायामाने शरीराची ताकद वाढते तर ध्यान केल्यामुळे मनाची ताकद वाढते. मनाची ताकद वाढली की विचार करायची शक्ती वाढते, तारतम्य कळते, बऱ्या वाईटाचे आकलन होते. पाणी प्यावे, ध्यान करावे आणि दीर्घश्वसन करावे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी आपल्या संवादात केले. या कार्यक्रमास सुमारे ८० हून अधिक सहकारी उपस्थित होते.
याच श्रुंखलेत जैन फूडपार्क येथील ओनियन ट्रेनिंग हॉल येथे सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जैन अॅग्रिपार्क, जैन फूडपार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांना देखील नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. यासाठी सुमारे ९० सहकारी उपस्थित होते. यासाठी डॉ. प्रदीप ठाकरे यांनी जागतिक धुम्रपान निषेध दिनाबाबत आपल्या प्रास्ताविकात माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी समन्वयाचे काम जैन फूडपार्क येथील मानवसंसाधन विभागाचे सहकारी भिकेश जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या आरंभी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सी.एस. नाईक यांनी प्रास्ताविक केले. कंपनीचे जुने सहकारी झगडू सीताराम पाटील ह्यांनी स्वतः कसे व्यसनातून सुटका होऊ शकली याबाबत अनुभव कथन केले. त्यात ते म्हणाले की, व्यसन मुक्त होण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा असे सांगितले.या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले.