75 हजार रुपयांचा चेक स्विकारणारा मुख्याध्यापक अडकला लाचेच्या सापळ्यात

जळगाव : शैक्षणीक संस्थेत काम करणा-या दोघा उप शिक्षकांच्या बदलीस स्थगिती मिळण्यासह बदलीचा मंजुरी  प्रस्ताव रद्द करण्याकामी लाचेच्या स्वरुपात 75 हजार रुपयांचा एक पुर्ण पगाराचा चेक स्वत:च्या नावे घेणा-या मुख्याध्यापकास जळगाव एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेत शैक्षणीक संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि लिपीक अशा तिघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. संबंधीत शैक्षणीक संस्थेने तक्रारदार यांच्यासह त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदली 1 एप्रिल 2023 एरंडोल येथून धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कुल  येथे करण्यात आल्या बाबत मंजुरीसाठीचा प्रस्ताव 2 मे 2023 रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवला होता. संबंधित उप शिक्षक तक्रारदार यांच्यासह त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांच्या बदलीस स्थगिती मिळण्याकामी पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव आणि लिपीक नरेंद्र उत्तम वाघ अशा दोघांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. शैक्षणीक संस्थाध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांचादेखील या लाच मागणी प्रकरणात सहभाग आढळून आला आहे.

दोघा उप शिक्षकांचा एक महिन्याचा पुर्ण पगार अर्थात 75 हजार रुपयांची लाच चेकच्या स्वरुपात मुख्याध्यापक यांच्या नावे द्यावा अशी तक्रारदाराकडे अट घालण्यात आली होती. या 75 हजारात मुख्याध्यापक, लिपीक आणि शैक्षणीक संस्थाध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन अशा तिघांचा हिस्सा ठरला होता. संस्थाअध्यक्ष विजय महाजन यांनी लिपीक नरेंद्र वाघ यांच्या मोबाईल फोनचा वापर करुन तक्रारदार यांचेशी बोलणी केली. मुख्याध्यापक आणि लिपीक या दोघांनी सांगितल्याप्रमाणे पुर्तता करावी असे तक्रारदारास सांगून लाच देण्या घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे एसीबी पथकाजवळ पंचासमक्ष उघड झाले.

ठरल्यानुसार 75 हजार रुपयांचा लाचेचा चेक मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव यांनी शाळेत स्विकारल्यानंतर त्यांना लागलीच एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here