जळगाव : सध्या तात्पुरते निलंबीत असलेल्या जेडीसीसी बॅंकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन इतरांसोबत संगनमत करुन बनावट व खोट्या सह्या असलेल्या विड्रॉल स्लिपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मेहुणबारे पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रावसाहेब देशमुख (देशमुख वाडी चाळीसगाव), रविंद्र विश्वास पाटील (तामसवाडी – चाळीसगाव), प्रविण शांताराम पाटील (रा. तामसवाडी – चाळीसगाव), तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी मालेगाव विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सटाणा विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी आणि तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सामाजीक वनीकरण विभाग अशा सर्वांविरुद्ध हा गुन्हा मेहुणबारे पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे. लक्ष्मण देवराम पाटील (रा. द्रौपदी नगर जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
1 जुलै 2019 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जेडीसीसी बॅंकेच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक विशाल देशमुख यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारचा गैरवापर करुन संगनमत करुन विड्रॉल स्लिप द्वारे बनावट सह्या ख-या असल्याचे भासवून 1 कोटी 51 लाख 75 हजार 482 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक सुदाम काकडे करत आहेत.