जळगाव : मैत्रीणीसोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणासह त्याच्या मैत्रीणीकडील ऐवज चौघांनी हिसकावल्याची घटना मुक्ताईनगर नजीक माळेगाव येथील जंगल परिसरात घडली आहे. या घटने प्रकरणी मुक्ताई नगर पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुरहाणपूर जिल्ह्याच्या खडकोद येथील इलेक्ट्रीशियन व प्लंबींगची कामे करणारा तरुण बाळू दिनकर वाघ हा त्याच्या मैत्रीणीसह 3 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर नजीक माळेगाव जंगल परिसरात फिरायला गेला होता. दोघे जण जंगलात गप्पा करत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या चौघा अनोळखी इसमांनी त्यांच्या ताब्यातील मोबाईल, रोख रक्कम व एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकुण बावीस हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. मारहाण व शिवीगाळ करत दोघांसोबत हा प्रकार घडला. या घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.