जळगाव : रातोरात रेशनच्या धान्याची मोटार सायकलने होणारी चोरटी वाहतूक व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाल्यानंतर देखील महसुल विभागाने संबंधीत रेशन दुकानदाराला क्लिन चिट दिल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे रविवारची सुटी असतांनाही महसुल विभागाने आपली चौकशी तातडीने पुर्ण केली आहे. राज्यातील कथीत गतीमान सरकारची एवढी गतीमान चौकशी संशयास्पद असल्याचे जनतेत म्हटले जात आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी या गावी रात्रीच्या अंधारात रेशनच्या गव्हाची चोरटी वाहतूक होत असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाले. हा व्हिडीओ व्हायरल करणा-या तक्रारदाराने माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा केली. दीपककुमार गुप्ता यांनी व्हिडीओ तयार करणा-या तरुणास योग्य ते मार्गदर्शन केले. त्यानंतर गुप्ता यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. रविवारी तालुका पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी तसेच पुरवठा अधिकारी पी.पी. पाटील यांनी वडनगरी गाठून पाहणी केली. तपासणीअंती धान्य साठा सुरक्षीत असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल तहसिलदारांकडे दिला जाणार आहे. आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नसल्याची तक्रार व्हिडीओ तयार करणा-या तरुणाने माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे.