जळगाव : पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणा-या औषधींची निर्मिती घरगुती स्वरुपात सुरु असल्याचा प्रकार कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील संजय संतोष बेलदार यांच्या घरात टाकण्यात आलेल्या छाप्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील धनश्री नगरातील संजय बेलदार यांच्या घरात पिकांवर फवारणी करण्याच्या औषधीचे उत्पादन सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षकांना समजली होती. कृषी विभागाच्या मदतीने या बातमीची खात्री करुन उप विभागीय अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील कृषी अधिकारी विकास उत्तमराव बोरसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक पथक आदींच्या पथकाने या ठिकाणी जावून कारवाई केली. या छापा कारवाईत विनापरवाना बी.टी. स्पेशल पिक संजीवकाचा 2 लाख 4 हजार रुपये किमतीचा एकुण 390 लिटर संशयास्पद साठा आढळून आला.
कृषी ह्युमस हे पिक संजीवक औषध तयार करुन ते विक्री करण्याचा संजय बेलदार यांच्याकडे परवाना होता. मात्र हे औषधाची निर्मिती स्वतंत्र कंपनीत करणे बंधनकारक असतांना ते घरात तयार केले जात होते.हस्तगत करण्यात आलेल्या औषधांचे नमुने घेण्यात आले असून कृषी विभाग पुढील कारवाई करणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल जाधव, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक विजय पाटील, पो.कॉ. सचिन महाजन, चालक पोलिस नाईक दर्शन ढाकणे आदींनी या छापा कारवाईत सहभाग घेतला.