जळगाव : क्रिप्टो करन्सीमधे पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळवून देतो असे अमिष दाखवत रावेर तालुक्यातील केळी व्यापा-याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मोरगाव खुर्द ता. रावेर येथील अमोल भिका पाटील हे पंचवीस वर्ष वयाचे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या मोबाईलमधील व्हाटस अॅप आणि टेलीग्राम अॅपवरील क्रमांकावर सुजाता, शिवणी, स्वाती अशी नावे सांगणा-या तरुणींनी वेळोवेळी संपर्क साधला.
अमोल पाटील यांचा या तरुणींनी ऑनलाईन संपर्क साधून विश्वास संपादन केला. क्रिप्टो करन्सी मधे गुंतवणूक करुन जास्त नफा मिळवून देण्याचे पलीकडून संपर्क साधणा-या तरुणींनी आमिष दाखवत अमोल पाटील यांना गळ घातली. या अमिषाला बळी पडणा-या अमोल पाटील यांच्या बॅंक खात्यातून 7 लाख 14 हजार रुपयांची रक्कम वर्ग झाली मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. याशिवाय त्यांचा मित्र गोविंद पितृभक्त हा देखील अशाच अमिषाला बळी पडून 5 लाख 71 हजारात फसवला गेला. दोघांची एकुण 12 लाख 85 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. बी.डी. जगताप करत आहेत.