पोलिस, वाळू आणि मद्य व्यावसायीकांची पंगत — व्हिडीओतून समोर आली सर्वांची रंगत – संगत   

जळगाव : जळगाव शहरातून धुळ्याच्या दिशेने जाणा-या महामार्गावरील हॉटेल सायली येथे पोलिस कर्मचा-यांसह त्यांची इतर मित्रमंडळी हलगीच्या तालावर नाचत असतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हीडीओने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटाच्या शुटींगसाठी निवडलेला परिसर ब्लॉक केला जातो त्याप्रमाणे या नाचण्याच्या कार्यक्रमासाठी हॉटेल सायलीचा परिसर अधिग्रहीत करण्यात आल्याचे व्हिडीओत दिसून आले आहे. या कार्यक्रमासाठी खास हलगी वादक बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम कधी झाला हे  हॉटेल सायलीचे मालक आणि हलकी वादक निश्चित सांगू शकतील.

तन – मन मंत्रमुग्ध करणा-या पाण्याची बाटलीतून फवारणी करणारा एक बंदा या व्हिडीओमधे दिसून येत आहे. कॅमे-यात कैद झालेला तो बंदा देशी विदेशी मद्य निर्मिती करणारा माफीया असल्याचे कुठे हळूच तर कुठे उघड म्हटले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेला हा बंदा सध्या चोपडा मुक्कामी असल्याचे देखील म्हटले जात आहे. खरे खोटे रामजाने. या नृत्यातील एक एक चेहरा ओळखून कुणाचा काय रोल, कुणाचे काय पद, कुणाचा काय व्यवसाय हे जाणून घेण्याची जनतेला आतुरता लागली आहे.  

मिळालेली माहिती आणि चर्चेनुसार व्हिडीओत दिसणारा पाण्याची फवारणी करणा-याविरुद्ध काही वर्षापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पो.नि. सुनिल कुराडे यांनी कारवाई केली होती. काही लाख रुपयांच्या बनावट मद्यसाठ्या प्रकरणी ती कारवाई करण्यात आली होती असे ऐकीव चर्चेतून म्हटले आणि समजले जात आहे. तो पोलिस तपासाचा भाग आहे. याशिवाय इतर जण वाळू व्यवसायाशी संबंधीत असल्याचे देखील समजते. यातील पोलिस बांधवांना जनता ओळखत असल्याचे म्हटले जाते. हा कार्यक्रम रात्री दहा वाजेनंतर सुरु होता असे देखील म्हटले जाते. या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात वेगळा संदेश जात असून पोलिस अधिक्षक याबाबत काय कारवाई करतात याकडे जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here