जळगाव : अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या तरुणासह त्याला आश्रय देणारा आणि पळून जाण्यास मदत करणारा अशा तिघा तरुणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विकास दौलत बारी, गणेश अशोक अस्वार आणि सागर अनिल बारी अशी तिघा संशयीत आरोपी तरुणांची नावे आहेत.
शिरसोली येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. तपासाअंती अल्पवयीन मुलीसह तिला पळवून नेणारा विकास दौलत बारी अशा दोघांना सुरत येथून गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. पिडीत मुलीस सोबत घेऊन विकास बारी हा भाड्याच्या खोलीत रहात होता. गणेश अशोक अस्वार याने पिडीत मुलगी आणि विकास बारी अशा दोघांना मोटार सायकलने पाचोरा येथे सोडण्याचे काम केले होते. याशिवाय सुरत येथे राहणारा सागर अनिल बारी याने दोघांना राहण्यासाठी भाड्याची खोली घेऊन देण्याकामी मदत केली होती. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोहेकॉ. रतिलाल पवार, मपोकॉ. अर्चना गायकवाड आदींच्या पथकाने सुरत येथे जावून कारवाई केली. संशयीत आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.