जळगाव : प्रतिबंधक कारवाई प्रकरणी पुढील तारीख न देता जामीनावर मुक्तता करण्याकामी मदत म्हणून अडीच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्विकार करणारा चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपीक एसीबी कारवाईच्या जाळ्यात अडकला. दिपक बाबुराव जोंधळे असे धुळे एसीबी युनिटने केलेल्या कारवाईत सापडलेल्या लिपीकाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या पक्षकारांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासंदर्भात मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपीस पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्यासाठी मदतीपोटी अडीच हजार रुपये लाचेची मागणी लिपीक दिपक जोंधळे याने तक्रारदाराकडे मागितले होते. मागितलेली लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीच्या सापळा पथकाने दिपक जोंधळे यास ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली. सापळा अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकातील पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.