जळगाव दि.17 प्रतिनिधी – रत्नागिरी येथील नामदार उदय सामंत फाउंडेशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रत्नागिरी कॅरम लीग या स्पर्धेच्या सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस ह्या संघाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना तृतीय क्रमांक पटकाविले. जैन सुप्रीमोस संघाला रोख रुपये एक लाख वीस हजार व आकर्षक असे चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाले.
सदर संघात कर्णधार म्हणून ठाण्याचा जैद फारुकी, उपकर्णधार पंकज पवार तसेच धुळे चा निसार शेख, पुणे चा किरण धेंडे आणि जळगावची आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आईशा खान यांचा समावेश होता. तसेच संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जळगावचे राष्ट्रीय कॅरम खेळाडू सय्यद मोहसिन यांची निवड करण्यात आली होती. सदर संघाने साखळी फेरीत सात पैकी पाच सामने जिंकून एकूण दहा गुणांची कमाई केली. ह्या स्पर्धेत अव्वल चारही संघांचे एकूण दहा गुण होते. परंतु गुण आणि सेट यांच्या सरासरी नुसार जैन सुप्रीम संघाला अंतिम चौघात चौथे स्थान प्राप्त झाले होते.
यानंतर जैन सुप्रीमोस संघाने एलिमिनेटर राउंड मध्ये कॅरम लवर्स ह्या रत्नागिरीच्या संघास २-१ ने पराभूत करून क्वालिफायर-२ साठी आपले स्थान निश्चित करून स्पर्धेतील तिसरे क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. क्वालिफायर-२ च्या सामन्यात जैन सुप्रीमोस संघाला मुंबईच्या शिवगर्जना संघाविरुद्ध एक दोन ने पराभव स्वीकारावा लागला. जैन सुप्रीमोज संघाच्या या यशस्वी कामगिरीवर त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मोहम्मद फजल तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान व इत्यादींनी अभिनंदन केले आहे.