जळगाव दि.17 प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित अधिकृत ३३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धा दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना जळगाव येथे राज्य स्पर्धेचे आयोजन करत आहे. अधिकृत राज्य संघटनेच्या बॅनरखाली जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या मदतीने जळगाव येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल जळगाव येथे 3३ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांच्या ८ व महिलांच्या ८ वजनी गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेंसर वर पार पडणार आहेत.
क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसे चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह नव्याने राष्ट्रीय पंच परीक्षा व रिफ्रेशर सेमिनार उत्तीर्ण राष्ट्रीय पंचांच्या मदतीने या स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच अधिकृत जिल्हा संघटना आपल्या निवड झालेल्या खेळाडूंची प्रथमच नोंदणी करणार असून यामुळे राज्य संघटना आता नवनवीन आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान अवगत करत आहे. राज्य संघटनेचे पदाधिकारी असलेले अजित घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी,यांच्यावर राज्य स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे.
खेळाडूंसाठी नेहमीच पाठबळ देणारी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा प्रवेश शुल्क, प्रवास भाडे, किट आदी सुविधा खेळाडूंना नेहमी प्रमाणेच राज्य संघटनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर देखील आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती तायक्वांदो. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा, महासचिव मिलिंद पठारे, अजित घारगे, शाम खेमसकर, निरज बोरसे आदींनी माहिती दिली